महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी अनेक प्रयत्न अनेक वर्षे करीत असले तरी गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कामाची गती आणि प्रगतीची प्रचीती येत आहे. मग ते मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी उभारलेले लोकाभियान असो अथवा भिल्लारप्रमाणे अन्य चार ठिकाणी पुस्तकाचे गाव उभारण्याची सुरुवात असो, अशा फक्त लोकप्रिय घोषणा न करता प्रत्यक्षात कृती करताना महाविकास आघाडी सरकार दिसत आहे. मराठी भाषा प्रसारासाठी, संवर्धनासाठी घेतलेल्या निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबईत मराठी भाषा भवनाची निर्मिती हा होय. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.