अकोला : सोशल मीडियावर कथित वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अकोल्यात उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना शनिवार, २० मे २०२३ रोजी अटक केली आहे. मोहता मिल परिसरातील २३ वर्षीय युवक हा दंगलीचा मुख्य आरोपी आहे. ज्या व्यक्तीचे नाव इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्याबद्दल घेतल्या जात होते. ते फेक अकाऊंट कुणीतरी भलताच चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचे अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, १३ मे २०२३ रोजी सोशल मीडियावरील कथित वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आल्याचा आरोप होता. मोहता मिल परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय युवकासोबत इन्स्टाग्रामवर ही चॅटिंग सुरू होती. चॅटिंगदरम्यान मोहता मिल परिसरातील युवकाने त्याचे स्क्रिनशॉट काढले व ते मुस्लिम समुदायाच्या सोशल मीडिया ग्रुप्सवर व्हायरल केले. त्यानंतर याच तरुणाने जमाव जमवित रामदासपेठ पोलिस ठाण्यावर नेला. त्यानेच रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर रामदासपेठ पोलिस ठाण्यातून बाहेर पडलेला जमाव हिंसक झाला. बस स्थानक, गांधी चौक, सिटी कोतवाली, जुने शहर, हरीहरपेठ, पोळा चौक आदी भागात जमावाने तुफान दगडफेक व जाळपोळ केली. यात विलास गायकवाड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. २२ जण जखमी झालेत. जखमींमध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे. घटनेनंतर आतापर्यंत पोलिसांनी १४८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात ६ अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे.
पोलिस आणि सायबर सेलने तपास केल्यानंतर मोहता मिल परिसरातील २३ वर्षीय युवकाला अटक केली आहे. तर दुसऱ्याला जुने शहर भागातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. यात प्रमुख चिथावणीखोर भूमिका मोहता मिल परिसरातील तरुणाची असल्याने तक्रारकर्ता आता दंगलीचा आरोपी झाला आहे, असे रामदासपेठ पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चॅट व्हायरल करणारा तरुण मुंबईत व्हिएफएक्स अॅनिमेशनच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
अकोल्यातील या दंगल प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह रामदासपेठ आणि जुने शहर पोलिस अद्यापही या दंगलीचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी का टाळली नावे?
अकोल्यातील दंगलीचे प्रकरण हे दोन समुदायातील आहेत. प्रारंभी तपासाच्या आधारावर दोन मुख्य आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परंतु त्यांची नावे जाहीर करून जिल्ह्यातील वातावरण आणखी बिघडू नये यासाठी पोलिसांनी अधिकृतपणे आरोपींची नावे घोषित केलेली नाहीत. पोलिसांनी घेतलेली ही खबरदारीची भूमिका लक्षात घेता ‘नवस्वराज’ देखील एक जबाबदार मीडिया माध्यम म्हणून अधिकृत दुजोरा न मिळता कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख टाळत आहे.