Mumbai : उच्च व तंत्र शिक्षणातील तब्बल 600 अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण दिले जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे जाहीर केले. मुलींचे उच्च शिक्षणही आता मोफत होणार आहे. शिक्षणाचे शुल्क राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेचे रूपांतर लवकरच निर्णयात होणार आहे. प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात गांभीर्याने पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारकडून 100 टक्के शुल्क परत मिळण्याची सोय उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-या अनेक मुलींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पालकांचे उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असल्यास अशा विद्यार्थिनींना सध्या ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते.
वैद्यकीय, कृषी क्षेत्रासाठीही लाभ
उच्च व तंत्र शिक्षणाबरोबरच वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमासाठीही १०० टक्के शुल्क प्रतिपूर्तीचा निर्णय लागू असणार आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिका-यांच्या उच्चस्तरीय बैठका होत असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेचे लवकरच सरकारी निर्णयात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना पूर्ण फी माफ आहे. केंद्र सरकार 60 टक्के आणि राज्य सरकार 40 टक्के सवलत देते. त्याधरतीवर ओबीसी आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीयांसाठी 642 कोर्सेसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निम्मे फी सुरू झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलीने चिठ्ठीत असे लिहिले की, माझी निम्मे फी सरकार भरतेय त्यासाठी धन्यवाद, पण उरलेली निम्मे फी भरण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी आत्महत्या करतेय. आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी प्रसार माध्यामांशी बोलताना त्यांनी सांगितले.