Home » Lok Sabha Election : पूर्व विदर्भात शुक्रवारी मतफैसला

Lok Sabha Election : पूर्व विदर्भात शुक्रवारी मतफैसला

Political News : 95.54 लाख मतदार करणार उमेदवारांचा फैसला

by admin
0 comment

Nagpur : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये शुक्रवारी (ता.19) मतदान घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या इव्हीएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली आहे. पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅटची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग करण्यात आली आहे. एकूण 10 हजार 652 मतदान केंद्र कार्यरत राहणार आहेत.

पूर्व विदर्भातील 95 लाख 54 हजार 667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 21 हजार 527 बॅलेट यूनिट (बीयू) , 13 हजार 963 कंट्रोल यूनिट (सीयू) आणि 14 हजार 755 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. 97 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. गडचिरोली-चिमुर या लोकसभा मतदारसंघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

आकर्षक सजावट

मतदारांना आकर्षित करण्यासाठी बांबूच्या बुथपासून मेट्रोच्या थीमपर्यंत 10 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महिला, युवा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; त्यांना टक्कर देणारे आमदार विकास ठाकरे, राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे राजू पारवे, हॅट्‌ट्रिकची आस बाळगून असणारे अशोक नेते हे या फेरीतील महत्त्वाचे उमेदवार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रचारात स्थानिक प्रश्न वा जनसामान्यांच्या प्रश्नांऐवजी भावनिक मुद्दे, सहानुभूतीचा प्रयत्न प्रभावी ठरला. यंदा मतदान ७५ टक्क्यांपेक्षा अधिक व्हावे यासाठी प्रशासन आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री व एका माजी राज्यपालाच्या भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद होणार आहे.

कोठे किती जागांसाठी मतदान

महाराष्ट्र (05) तमिळनाडू (39), राजस्थान (12), उत्तर प्रदेश (08), उत्तराखंड (05), मध्य प्रदेश (05), आसाम (05), बिहार (04), पश्चिम बंगाल (03), मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय (प्रत्येकी 02), अंदमान आणि निकोबार, मिझोराम, नागालॅन्ड, पुदुच्चेरी, सिक्कीम आणि लक्षद्वीप, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड (प्रत्येकी 01)

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!