Crime News : लोकसभा निवडणूक आणि आगामी काळातील उत्सवांची रेलचेल बघता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहावी यासाठी अकोला पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. अशाच एका कारवाई अंतर्गत अकोला जिल्ह्यातील बाराव्या कुख्यात गुन्हेगाराला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शेख शाहरुख शेख मेहबूब (वय 28) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनटक्के प्लॉट परिसरात राहणाऱ्या शाहरुख विरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम असल्याने पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशावरून शाहरुख विरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहराचे पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी, गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे, कर्मचारी ज्ञानेश्वर सैरीसे, उदय शुक्ला, जुने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन लेव्हरकर, संतोष मेंढे यांनी हा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला.
सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी शेख शाहरुख शेख मेहबूब याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच पोलिसांनी त्याला अकोला कारागृहात जेलबंद केले.