Karnataka : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. निवडणुकीच्या अगोदर अनेक नेत्यांना धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. राहुल गांधी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला होता ज्यामध्ये त्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. भारतीय दंड संहिता (IPC) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 505 (1) (B) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याशिवाय सुरपूर पोलिस आरोपींच्या शोधात असून यासंदर्भात हैदराबादसह अनेक भागात छापे टाकले जात आहेत.
रिपोर्ट्सनुसार कर्नाटकातील यदगिरी पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या प्रकरणात सुरपुर पोलिस स्थानकात मोहम्मद रसूल कडारे याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने भाजप नेते आणि ज्येष्ठ वकील नलिन कोहली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोहली यांनी म्हटले की, “पंतप्रधानांना देण्यात आलेल्या धमकीवरुन दिसते कर्नाटकातील अशा काही गोष्टी उघडकीस येतात ज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. याशिवाय जे पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देतात आणि जे तेथील रेस्टॉरंटमध्ये बॉम्ब फेकून पळून जातात. कर्नाटकातील पोलिस आणि अन्य यंत्रणा आपले काम जरुर करताय. पण प्रश्न असा उपस्थितीत होतोय, एकत्रित अशा काही गोष्टी घडतायत यामागे अखेर मानसिकता काय आहे?”