Home » Zomato Story : नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास

Zomato Story : नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास

Nagpur : झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांची माहिती

by नवस्वराज
0 comment

Nitin Gadkari : ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वात डंका गाजविणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरात झाला असल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’ दरम्यान दिली.

खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. चर्चासत्राची सुरुवात एंजल इन्व्हेस्टर शशिकांत चौधरी यांनी घेतलेल्या झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. झोमॅटोच्या प्रवासाबाबत सांगताना राकेश रंजन म्हणाले की, सात वर्षांपूर्वी झोमॅटो जॉइन केले. त्यावेळी झोमॅटो अॅप सुरू करणारे नागपूर हे पहिले शहर होते. तेथेच आज संवाद साधत असल्याचा अतिशय आनंद वाटतो आहे.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक जे खाद्यपदार्थ कुठल्याही पारंपरिक हॉटेल – रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाहीत, असे पदार्थ ऑर्डर करायचे. वेगळ्या प्रकारच्या, नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या ऑर्डर अधिक यायच्या. त्यानंतरच्या टप्प्यात नियमित ग्राहक वाढले. ते रोजच्या नाश्त्यातील, जेवणातील पदार्थ मागवू लागले. त्यामध्ये प्रामुख्याने पिझ्झा, डेझर्ट यांचा समावेश होता. आता ग्राहकांना राजस्थानी तसेच इतर प्रादेशिक जेवण त्या-त्या पारंपरिक अनुभवासह हवे आहेत. त्यादृष्टीने आम्ही ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या चवीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. हे एक नवीन आव्हान आमच्यापुढे आहे.

मुलाखतीदरम्यान राकेश रंजन यांनी ग्रोथ आणि प्रोफॅटिबिलिटी यातील परस्परपूरकता, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याकडे भारतीयांचा वाढता कल तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप क्षेत्रातील इतर स्पर्धक याबाबत दिलखुलासपणे मते मांडलीत. आव्हाने कशीही येवोत ग्राहक सर्वतोपरी असल्याचे ते म्हणाले. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपच्या क्षेत्रात दररोज नवीन स्पर्धक येत आहेत. स्थानिक पातळीवर देखील स्पर्धक निर्माण झाले आहेत. या स्पर्धकांमुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकडे अधिक भर आहे. स्पर्धकांमुळे दर्जाशी तडजोड करत नाही. तसेच आव्हाने कशीही आलीत तरी आमच्यासाठी ग्राहक हाच सर्वतोपरी असल्याचे राकेश रंजन म्हणाले.

क्लाउड किचन कल्चर वाढले

आपल्याकडे पारंपरिक रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन असे दोन प्रकार आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपच्या उदयानंतर आणि विशेषत: कोव्हिडनंतर क्लाउड किचनचे ग्राहक वाढले आहेत. अनेक पारंपरिक हॉटेल – रेस्टॉरंट स्वत:चे क्लाउड किचन सुरू करत आहेत. गेल्या काही वर्षांतील हा बदल अविश्वसनीय आहे, याकडे देखील राकेश रंजन यांनी लक्ष वेधले.

‘बांबू थिम सॉंग’चे लोकार्पण

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे ‘विदर्भातील बांबू क्षेत्राचा विकास’ या विषयावरील चर्चासत्राला आवर्जून उपस्थित होते. त्‍यांनी ‘बांबू थिम सॉंग’चे विमोचन केले. या चर्चेत भाव्‍या सृष्‍टी उद्योगचे सीईओ गणेश वर्मा, वर्ल्‍ड बांबू अॅम्‍बेसेडर नीलम मंजुनाथ, ग्रीन सोल्‍यूशन इंडियाचे संजय स‍िंग, कॅनबूचे सीईओ कामेश सलाम, नीरीचे डॉ. लाल सिंग, वेधाचे प्रमुख आर्किटेक्‍ट सुनील जोशी, यथार्थ अॅग्री बिझनेसचे सीईओ राहूल देशमुख, बांबूस्‍टानच्‍या सहसंस्‍थापक दिव्‍या मुनोत व बांबू इंडिया प्रा. लि. चे योगेश शिंदे उपस्थिती होते. यावेळी नितीन गडकरी यांनी देशात बांबूचे अर्थकारण उभे करण्‍यासाठी तसेच, बांबूच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, असे आवाहन केले.

Nitin Gadkari at Akola : अकोल्यात गडकरी आले, तीन नवीन पूल भेट देऊन गेले

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!