Voter Contact Campaign : प्राचीन संस्कृतीपासून मातृशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा देशाची आहे. शारदा, लक्ष्मी, पार्वती, सीता, अहिल्या, दुर्गा, जिजाऊ, रमाबाई, सावित्रीबाई फुले, राधा, मिरा, रुक्मणी यांचा हा देश आहे. देशाची संस्कृती जतन करण्याचे काम मातृशक्तीने केले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोनदा बहुमताचे सरकार आणण्याचे काम मातृशक्तीने केले आहे. येणाऱ्या 2024 मध्याील निवडणुकीत ‘चारसौ पार’च्या आवाहनाला मातृशक्ती साद देणार आहे. भारताला महाशक्तीशाली राष्ट्र बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करावे, असे आवाहन सखीमंच नेत्या सुहासिनी संजय धोत्रे यांनी केले.
स्थानिक पश्चिम उत्तर मंडळात जागतिक महिला निमित्त विविध क्षेत्रातील 25 महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मंजुषा सावरकर, पुष्पा खंडेलवाल, अर्चना मसने, सीमा मांगटे पाटील, सुनिता अग्रवाल, अर्चना शर्मा, चंदा शर्मा, माजी महापौर सुमन गावंडे, गीतांजली शेगोकार, शुभांगी कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त अकोला महानगरातील पश्चिम उत्तर मंडळात ‘उत्सव नारीशक्तीचा’ साजरा करण्यात आला. डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेन्टमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पश्चिम उत्तर मंडळात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 25 महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी साडेचारशे महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सुहासिनी धोत्रे आणि अर्चना शर्मा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली शेळके यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी कायंदे यांनी केले. आभार रंजना विंचनकर यांनी मानले. वैशाली शेळके, रश्मी कायंदे, रंजना विंचनकर, विजया देशमुख ज्योती मानकर, सुनीता दळवी, साधना येवले, माधुरी क्षीरसागर, सोनल शर्मा आणि चारुशीला ढगे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.