Nagpur : नागपूर भाजपतर्फे महिला बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबिरात झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करीत मृताच्या कुटुंबाला 25 लाख आणि जखमींना प्रत्येकी दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कामगारांच्या हक्काच्या सरकारी पैशांनी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना भांडी वाटप करून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात भाजप निष्पाप लोकांचा जीव घेणार का? याला जबाबदार कोण? या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का? की फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण नस्ती बंद करणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
बांधकाम कामगार कल्याण मंडळाअंतर्गत, नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. येथे लोकांची गर्दी एवढी वाढली की, चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी झालेत. मनू तुलसीराम राजपूत असे या मृत महिलेचे नाव आहे. मनू यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून घटनेचा तपास करीत आहेत.