मुंबई : यंदाच्या हंगामात शासनाच्या आधारभूत ५ हजार ३३५ रुपये किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे. पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यंदा पाच लाख क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश सरकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे.
बाजारपेठेत हरभऱ्याला दर कमी असल्याने शासकीय खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन वेळा उद्दीष्ट वाढवून द्यावे लागले होते. आणखी उद्दीष्ट वाढवून मिळावे यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. अशात शासनाने सोमवार, २२ मे २०२३ रोजी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांना सुमारे पाच लाख क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांचा अतिरिक्त हरभरा देखील खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केल्याबद्दल राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे अकोला भाजपाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
हरभऱ्याचे ८७ कोटी ५७ लाख रुपयांवरील चुकारे आतापर्यंत देण्यात आले आहेत. शासकीय हरभरा खरेदी नाफेडमार्फत आठ ते नऊ एजन्सीजद्वारे केली जात आहे. जिल्ह्याजिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी कंपन्यांद्वारे प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. राज्यात आतापर्यंत खरेदीचा आकडा ६५ लाख क्विंटलपेक्षा अधिक झालेला आहे. यंदा खरेदीसाठी उत्पादकतेच्या २५ टक्के खरेदीचा निकष लावल्याने अडचण झाली होती. त्यानुसार पहिल्यांदा मिळालेले उद्दिष्ट केव्हाच पूर्ण झाले. त्यानंतर बरेच दिवस खरेदी बंद राहिली. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खरेदीला सुरुवात झाली. आता अतिरिक्त उद्दीष्टांसह खरेदी होणार आहे.
अकोला जिल्ह्याला एक लाख क्विंटलचे उद्दीष्ट वाढवून देण्यात आले आहे. बुलडाणा, अमरावती प्रत्येकी दीड लाख, यवतमाळ ७० हजार आणि वाशीम जिल्ह्याला ३० हजार क्विंटलचा लक्ष्यांक वाढवून मिळाला आहे. त्यानुसार खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यंदाच्या हंगामात ११ जूनपर्यंत नाफेडची ही खरेदी होणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे उद्दीष्ट आता सरकारने वाढवून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.