अकोला : जिल्ह्यातील दोन लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील जलसाठाही मोजकाच राहिला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जरा जपुनच करा, असे आवाहन प्रशासनाकडुन अकोलेकरांना करण्यात आले आहे. ‘जलही जीवन’ म्हटले जाते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय तसाही टाळला जावा असे प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.
अकोल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा या मोठ्या प्रकल्पात सध्या ३३.७१ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. वान हा दुसरा मोठा प्रकल्प आहे. त्यात सद्य:स्थितीत ४०.९६ दशलक्ष घनमीटर जलसाठा असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाकडुन देण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा अल्प प्रमाणात आहे. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि 23 लघु प्रकल्प अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात.
नोव्हेंबर पर्यत जोरदार पाऊस झाल्याने जवळपास सर्वच लघु प्रकल्प ओसंडू वाहिले. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाचे अनेकवेळा दरवाजे उघडावे लागले होते. पुरेसा पाऊस झाल्याने मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा असला तरी लघु प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना आणि मोऱ्हळ हे दोन लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. पिंपळगाव, इसापूर, घोटा या प्रकल्पात पाच टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. लघु प्रकल्पांमधील जलसाठा आटल्यामुळे परिसरातील पशुधनापुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.