Akola : मालमत्ता कर थकल्याने आता अकोल्यात महापालिकेने दुकाने सील केली आहे. 11 मार्च रोजी महानगरपालिका उत्तर झोनअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केडिया ट्रेडिंग कंपनीकडे 2017-18 ते 2023–24 पर्यंतचा मालमता कर थकला होता. ही रक्कम 92 हजार 165 रुपये होती. बन्सल ट्रेडिंग कंपनीकडे 2017-18 ते 2023–24 पर्यंतच्या थकित मालमता करापोटी 1 लाख 69 हजार 035 रुपये थकीत होते. कर न भरल्याने दुकानांना मनपाच्या जप्ती पथकाने सील लावले.
मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते, कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सहाय्यक कर अधीक्षक हेमंत शेळवणे, नारायण साखरे, मोहन घाटोळ यांच्यासह स्वाती इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेष होता. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षाच्या मालमत्ता कराचा भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहनमनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी केले.