Home » अकोल्यातील धाडीमुळे कृषिमंत्र्यांची अडचण वाढणार

अकोल्यातील धाडीमुळे कृषिमंत्र्यांची अडचण वाढणार

by नवस्वराज
0 comment

अकोला : कृषिमंत्री अब्दुल सत्तार अकोल्यातील धाडसत्र आणि त्यानंतर मागण्यात आलेल्या लाचेच्या मुद्द्यावर अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या धाडीतील पथकात असलेला दीपक गवळी हा आपला स्वीय सहायक नसल्याची प्रतिक्रिया सत्तारांनी १० जूनला अकोल्यात दिली होती. मात्र, २० दिवसांपूर्वीच्या त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय दौऱ्यात गवळीचा उल्लेख स्वीय सहायक असा आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या खोटे बोलण्याचा पुरावाच समोर आला आहे. त्यामूळे अब्दुल सत्तार नेमके खोटे का बोलत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.

कृषी विभागाच्या कथित पथकाने कृषिमंत्र्यांच्या नावावर अकोला शहरातील एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या होत्या. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली होती. या पथकाने पैशाची मागणी केल्याचा देखील गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने केला होता. या पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्वीय सहायक दीपक गवळी आणि वादग्रस्त असलेल्या हितेश भट्टड यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले, त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावरून अब्दुलसत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर सत्तार यांनी दीपक गवळी हा आपला स्वीय सहाय्यक नसल्याचे नमूद केले होते.

कृषी मंत्री अकोल्यात येण्यापूर्वी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने अकोला शहरातील एमआयडीसी भागातील कृषी निविष्ठांच्या अनेक गोदामावर धाडी घालत तपासणी केली होती. काही गोदाम सील करण्याचीही कारवाई देखील केली. मात्र हे पथक आणि पथकातील सदस्यांवरून आता मोठा संभ्रम आणि शंका निर्माण केल्या जात आहेत.

अशा प्रकारच्या कोणत्याच तपासणीची परवानगी कृषी विभागाकडून घेण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. कृषिमंत्र्यांच्या नावावर कारवाई सुरू असलेल्या पथकातील दीपक गवळी आणि नागपूरच्या हितेश भट्टड यांच्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या दरम्यान प्रसार माध्यम प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता, यावेळी अनेक प्रश्न यातील सदस्यांना विचारल्या गेले. यात भट्टड कोण आहेत, असा प्रश्न केला असता त्याने देखील आपण भट्टड नसल्याचे खोटे सांगितले होते. त्यामुळे या धाडी पैसे खाण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या का, असा आरोप आता होत आहे. त्यामुळे संशयाची सुई कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडेही वळली आहे. परिणामी सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!