अकोला : उन्हाळ्यात सूर्य आग ओकु लागला, पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी कमी झाली की वृक्षांचे प्रमाण कमी असल्याची तीव्रतेने जाणीव होते. त्यानंतर शासन, नागरीक आणि सामाजिक संघटनांना वृक्षारोपणाचे भरते येते. वृत्तपत्रांतून वृक्षारोपणाच्या बातम्या झळकतात. शासनाने काही लाख वृक्ष लावल्याचे सांगितले जाते.
आपल्या देशात दरडोई फक्त २८ वृक्ष आहेत. ही आकडेवारी अन्य लहान देशांच्या तुलनेत ही अत्यंत कमी आहेत. रस्त्यांचा विस्तार करण्यासाठी दररोज हजारो झाडे कापली जात आहेत. बेकायदेशीर कत्तलीचा तर हिशोबच नाही. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. दरवर्षी ओला, कोरडा दुष्काळ, महापूर, भयंकर वादळ, हिम व भूस्खलन यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रचंड वित्त व प्राणहानी होते.
पृथ्वीच्या तापमानात वाढ होत असून वैज्ञानिक वेळोवेळी धोक्याचा इशारा देत आहेत. परंतु आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. आज जर परिस्थिती इतकी गंभीर आहे तर पुढील २५ वर्षानंतरची कल्पना न केलेलीच बरी. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने ते आपले कर्तव्य समजत करावेच. परंतु नुसती झाडे लावून चालणार नाही. ती जगावीत या दृष्टीकोनातून प्रामाणिक प्रयत्न करणेदेखील तितकेच आवश्यक आहेत.