बुलडाणा : तीन वेगवेगळ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्ग हादरला आहे. या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले आहेत. जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत, असे पोलिसांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज क्रमांक २८३ जवळ वाशिमहून बीडकडे जाणाऱ्या कारमधील काही प्रवासी थांबले होते. अज्ञात वाहनाने त्यातील विजय मंटे (रा. दिग्रस) याला धडक दिली. यात विजय हा जागीच ठार झाला. त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.
नागपूरकडे जाणाऱ्या अर्टिगा कारचा दुसरा अपघात झाला. ही कार धुळ्याहून नागपूरकडे जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात कारमधील तिघांपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जण जखमी आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर एक ट्रक चालकाला डुलकी लागली. यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून क्रॅश बेरिअर तोडून ट्रक महामार्गाच्या खाली उतरला. या अपघातात चालक दिनेशकुमार तिवारी (रा. आझमगड) हा जागीच ठार झाला. समृद्धी मार्गावरील अपघात अनेक उपाययोजना केल्यानंतरही थांबत नाही. आता वैयक्तिक प्रवास करताना वाहन चालकांना आपल्यावर आणि आपल्या वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. कारण की मुख्यतः समृद्धी मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांपैकी कौटुंबीक सदस्यांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे.