ऋषीकेश जकाते | भूषण इंदोरिया
Rushikesh Jakate | Bhushan Indoriya
Raid By Akot Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने अकोल्यात शस्त्र तस्करी करणाऱ्या तीन जणांना अकोट पोलिसांनी बंदूक व काडतुसांसह अटक केली. 16 जानेवारी 2024 रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे यांना या दोघांबाबत माहिती मिळाली होती.
अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याच्या पुलाखाली केशरी रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोघांजवळ बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे जवरे यांनी सहकाऱ्यांसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ एक रिकामे मॅक्झिन मिळाले. चौकशी केल्यानंतर त्यांनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे व 09 जीवंत राऊंड वीर एकलव्य आपत्कालीन पथकाच्या मदतीने जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अजय तुलाराम देठे (वय 27 वर्ष, रा. धोबीपुरा अकोट), प्रफुल्ल विनायक चव्हाण (वय 25 वर्ष, रा. अडगांव बु., ता. तेल्हारा जि. अकोला) यांना अटक केली.
गुन्ह्याच्या तपासात मास्टरमाइंड असलेला तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर (वय 25 वर्ष, रा. नेवरी ता. अकोट, जि. अकोला ह. मु. भालेकर वस्ती, वारजे, पुणे) याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्याला मध्य प्रदेशातील उजैनमध्ये शोधण्यात आले. मात्र तो पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला भालेकर वस्ती वारजे, पुणे येथुन अटक केली. शुभम लोणकर याच्या मोबाईलवरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल केल्याचा पुरावा सापडला आहे. त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसोबत ऑडीओ कॉल व इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे आढळले आहे.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, अकोट पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक राजेश जवरे, उपनिरीक्षक अख्तर शेख, उपनिरीक्षक गोपाल जाधव, हेडकॉंस्टेबल चंद्रप्रकाश सोळंके, कॉंस्टेबल विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पचांग, रवी सदांशिव, सागर मोरे, कपील राठोड, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, चालक उपनिरीक्षक वासुदेव धर्मे, चालक संदीप तायडे यांनी ही कारवाई केली.
कोण आहे लॉरेन्स बिष्णाई?
लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यता गँगस्टर आहे. त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी देशभरातील 700 शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे. बिश्नोई टोळीत भारतातील 5 राज्यांमधील 700 नेमबाज काम करीत आहेत. विशेष म्हणजे भारताबाहेरही त्यांचे नेटवर्क आहे. तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे. 2018 मध्ये बिश्नोईचा जवळचा सहकारी संपत नेहरा याने अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी केली होती. सलमानची हत्या करण्याचे काम संपतला देण्यात आले होते. या मागील कारण म्हणजे, बिश्नोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो. सलमानने काळविटाची शिकार केली होती.
29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर काही तासांनी गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हटले होते. 21 सप्टेंबर 2023 रोजी बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बिष्णोईच्या टोळी सोबत यांचे टोळीयुद्ध नेहमी चालायचे. त्यामुळे विश्नोईचे नाव खलीस्तानवादी चळवळीबाबतही घेतले जाते.