अमरावती : रामपुरी कॅम्प परिसरात असणाऱ्या विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या वसतिगृहात १२ वर्षीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर शालेय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदर्श नितेश कोगे (१२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) हे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे. आदर्शच्या पालकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे.
आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला जाणार आहे. विद्याभारती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या परिसरात वसतिगृह चालविते. या ईमारतीचा चौकीदार सकाळी मुलांना जागे करण्यास गेला तेव्हा आदर्शने प्रतिसाद दिला नाही. गृहपाल रवी तिघाडे यांना माहिती देण्यात आली. व्यवस्थापन व विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला देखील कळविण्यात आले. आदर्शला तातडीने डॉ. हेमंत मुरके यांच्या बालरूग्णालयात हलविण्यात आले. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केले. याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. दुपारी बाराच्या सुमारास आदर्शचे आईवडील व बरेचसे ग्रामस्थ देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले.
आपल्याला मारले, असा संदेश आपल्या मुलाने २० जुलै रोजी दुपारी व्हॉट्सॲपवर पाठविला. आता त्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा देखील दिसत आहे. जर त्याचा अन्य मुलांशी वाद झाला होता, तर आपल्या मुलाला गृहपालाने वेगळ्या खोलीत ठेवायला हवे होते. तसे न झाल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला असेल. त्यातून मारहाण झाली असेल आणि त्यात आपल्या मुलाचा मृत्यू झाला असावा, असा संशय आदर्शचे वडील नितेश यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनीदेखील विद्याभारती परिसर गाठला.