Supreme Court of India : मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे राणांना दिलासा मिळाला आहे. अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल गुरुवारी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला.
नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी 2011 मध्ये विवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.
2013 मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्याविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता.
अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघातून नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. जून 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्या निर्णयास आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला. त्यात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.