Weather Issue : लोकसभा निवडणुकीला होळीनंतर आता चांगलाच रंग चढला आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून कोण उमेदवार राहणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी आता बऱ्यापैकी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांना सध्या अडथळा जाणवतोय तो प्रचंड चटके लावणाऱ्या तापमानाचा. होळीनंतर विदर्भात सर्वच तापमानात अचानक वाढ झाली. पारा 38 अंश सेल्सिअसवरून एकदम 42 अंशांपार निघून गेला. त्याचा फटका निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना चांगलाच जाणवला.
कडक उन्हात ग्रामीण भागात प्रचार करताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विदर्भात सर्वत्र सध्या पारा चाळीशी पार असल्याने सर्वच लोकसभा मतदारसंघात चटके देणारे उन हिच मोठी समस्या आहे. एप्रिल महिन्यातच प्रचंड उन तापल्याने आणखी दोन महिने कसे जाणार याची चिंता आता सर्वांना आहे. लोकसभा निवडणुकीत उमदेवार असलेले नेते सकाळी लवकर घराबाहेर पडत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक ग्रामीण भागात संपर्क दौरा झाला पाहिजे यासाठी उमेदवार आग्रही आहेत. परंतु उन्हामुळे तुलनेने कार्यकर्ते गोळा होत नसल्याने जेवढे कार्यकर्ते असतील तेवढ्यांसोबतच उमेदवारांना प्रचार करावा लागत आहे.
पूर्व विदर्भात अधिक उष्मा
विदर्भात सर्वत्र पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसवरच आहे. मात्र पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात उन्हासोबतच उकाडाही जास्त आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे भर उन्हात प्रचार करताना सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना चटके सहन करावे लागत आहे. चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात कोळसा खाणींची संख्या सर्वाधिक असल्याने या भागातील वातावरण दमट राहाते. त्यामुळे वरून उन्हाचे चटके व शरीरातून गळणारा घाम अशा दुहेरी समस्येचा सामना राजकीय पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना करावा लागत आहे.
तीन आठवडे कस
भारतीय मौसम विभागाच्या वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या तीन आठवड्यात उन चांगलेच तापणार आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत सर्वच पक्षांना उन्हातान्हात वणवण भटकतच मतांसाठी प्रचार करावा लागणार आहे. तंत्रज्ञानाने कितीही सुविधा उपलब्ध करून दिलेली असली तरी प्रत्यक्ष प्रचारावर आजही अनेकांचा भर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
सभांचा धुराळा
विदर्भात अनेक ठिकाणी निवडणूक प्रचारासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आदी अनेक नेत्यांच्या सभांचे नियोजन तयार होत आहे. अशात उन्हाची वेळ टाळतच राजकीय पक्षांना सभांचे वेळापत्रक ठरवावे लागणार आहे.