अकोला : पुण्यातील आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले.
आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर, राजेश मिश्रा आदींच्या नेतृत्वात टाळ मृदंगधारी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला. यापूर्वी लाठीहल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने भाजपाच्या जिल्हा कार्यालयासमोर टाळ, मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले होते. शुक्रवार, १६ जून २०२३ रोजी दुसऱ्यांदा हे आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यामुळे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर पोलिसांनी गुन्हे नोंदविले होते. या घटनेचा व वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याचा निषेध शुक्रवारच्या आंदोलनातून करण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेते गोपाल दातकर यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रानुसार आळंदी येथे केवळ ७५ दिंड्यांची मर्यादा घालून भक्तीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बंदीमुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे गोंधळ उडणे स्वाभाविक होते. वारकरी गुंड नसून त्यांच्याशी नम्रतेने संवाद साधून मार्ग काढता आला असता. मात्र पोलीस प्रशासनाने लाठीमार केला आणि वारकरी परंपरेला धक्का पोहोचला. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आल्याचे दातकर यांनी नमूद केले.