अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला. सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिरीष धोत्रे यांनी विजय मिळविला, तर उपसभापती पदाच्या शर्यतीत ज्ञानेश्वर महल्ले यांनी बाजी मारली. त्यामुळे अकोला बाजार समितीवर पुन्हा धोत्रे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
सहकार पॅनल गेल्या ४० वर्षांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत आहे. गुरुवार, १८ मे २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीतही धोत्रे गट व सहकार पॅनलने आपला दबदबा कायम ठेवला. सहकार पॅनलचे १५ उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेत. त्यामुळे बाजार समितीवर सहकार पॅनलची सत्ता कायम राहणार आहे. या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र होता.
मुंबईनंतर विदर्भातील सर्वांत मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणुन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. त्यामुळे या बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सरपंच संघटना मैदानात उतरविली होती. शिव शेतकरी पॅनलही निवडणुकीच्या रणांगणात होते. मात्र त्यानंतरही सहकार पॅनलने बाजी मारली. राजकीय आखाड्यात एकमेकांचे विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीत एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ११ संचालक निवडणुकीत होते, भाजपाचे ५ आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे २ उमेदवार निवडणुकीत विजयी झालेत.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेहमीच वसंतराव धोत्रे गटाचे वर्चस्व राहिले आहे. २००८ मध्ये शिरीष धोत्रे बाजार समितीचे सभापती झाले होते. यंदाही त्यांना पूर्ण बहुमत मिळाल्याने सभापतिपद त्यांनीच काबिज केले. अकोला बाजार समितीवर शिरीष धोत्रे हे चवथ्यांदा सभापती म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे चारही वेळा ते बिनविरोध सभापती म्हणून निवडून आले आहेत.