Akola : प्रकृती व अन्य कारणांमुळे अनेक वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाणे शक्य नसते. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागते. मतदानाच्या टक्केवारीवरही याचा काहीअंशी परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने अशा मतदारांची गैरसोय 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकीपासून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 D नमुन्याचे वाटप करणे सुरू झाले आहे.
मतदारांना हा अर्ज नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. 85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरूनच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 D मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. भारत निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांची गैरसोय दूर होणार आहे. अर्ज नमुनाही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या पुरविता येऊ शकतो का, यांचा प्रयत्न सुरू आहे.
घरबसल्या निवडणूक कार्ड बनवा
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले तरुण घरबसल्या निवडणूक कार्ड बनवू शकतात अथवा त्यात दुरूस्ती करू शकतात. मतदारांना www.voters.eci.gov.in या लिंकवरुन 27 मार्च 2024 पर्यंत दुरुस्ती करता येणार आहे. ऑनलाइन मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोयही येथे आहे.