Mumbai : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसरी उमेदवारी यादी बुधवारी (ता. 13) सायंकाळी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री तथा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश आहे. हिना गावित यांना नंदुरबार, स्मिता वाघ यांना जळगाव. रक्षा खडसे यांना रावेर, महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून भाजपने संधी दिली आहे. केंद्रातील विद्यमान मंत्री डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
माजी मंत्री पीयूष गोयल यांना मुंबई उत्तरमधून संधी देण्यात आली आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून तर भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यातील एकूण 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. देशातील 72 उमदेवारांच्या नावांची घोषणा भाजपचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे. धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे, अकोला मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, वर्धातून रामदास तडस, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जालन्यातून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भिवंडीतून कपिल पाटील, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, लातुरातून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजित सिन्हा नाईकनिंबाळकर, सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देशातील अन्य राज्यातील उमेदवारांचाही यात समावेश आहे. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरधून अनुराग ठाकूर, कर्नाटकच्या बेंगरुळु दक्षिणनेतून तेजस्वी सूर्या, तेलंगणातील महबूबनगरमधून डी. के. अरुणा, त्रिपुरा पूर्वमधून महाराणी कृतीसिंह देबबर्मा यांनाही भाजपने संधी दिली आहे.
BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections pic.twitter.com/bpTvxfMkDr
— ANI (@ANI) March 13, 2024
विदर्भातील अन्य घोषणांची प्रतीक्षा
विदर्भातील काही लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. यातील अमरावतीच्या उमदेवाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अमरावतीमध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या नावाला महायुतीमधील सर्वच नेत्यांचा विरोध आहे. हा विरोध लेखी स्वरुपात नोंदला गेला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याबद्दल चांगलीच नाराजी असल्याने येथेही भाजपने दावा केला आहे. शिवसेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याने येथे मंत्री संजय राठोड यांच्या नावाचा विचार करण्याचा सल्ला भाजपने शिवसेनेला दिला आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघ आणि गडचिरोली मतदारसंघातूनही उमदेवारांच्या नावांची घोषणा भाजपने टाळली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गडचिरोलीच्या जागेवर राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दावा केला आहे. येथे अशोक नेते हे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
अकोल्यात चूरस
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केव्हाच निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजपने अनुप धोत्रे यांचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेसनेही अकोला लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेशाचा प्रयत्न सुरू आहे. अशात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने सोबत घेतल्यास अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसले. त्यामुळे भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल. परंतु वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास काँग्रेस येथे उमेदवार देणार आहे. असे झाल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होणार आहे.
ठरलेला ‘गेम’!
अकोला लोकसभा मतदासंघात कोणाचा कसा व केव्हा ‘गेम’ करायचा याचा ‘प्लान’ भाजपजवळ तयार आहे. त्यामुळे उमेदवारांचे नाव निश्चित झाल्यानंतर आता अकोला मतदारसंघातून कोणाला खासदार म्हणून पाठवायचे, याचा ‘रोडमॅप’आधीच भाजपच्या वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे. ठरलेल्या नियोजनानुसार फक्त आता मार्गक्रमण सुरू झाले आहे. अनुप धोत्रे यांना आता प्रकाश आंबेडकर यांना टक्कर द्यावी लागणार आहे. कदाचित वंचित बहुजन आघाडीचा अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीत समावेश होईल व धोत्रे विरुद्ध आंबेडकर अशी अटीतटीची लढत होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.