अकोला : अकोला महापालिकेतून मृत्यूचा दाखला मिळविण्याचा मार्ग आता अधिक अवघड झाला आहे. महापालिकेने मृत्यूचा दाखला देताना शासकीय नियमांची फुटपट्टी लावल्याने सामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमांबद्दल अकोला महापालिकेने कुठे प्रचार-प्रसार न केल्याने अंत्यसंस्कार झाल्यानंतर नागरिकांना मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी ससेहोलपट करावी लागत आहे.
एखाद्या व्यक्तीचा त्याचे घरी नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास, त्याचा महानगरपालिकेचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी स्मशानभूमिच्या दाखल्या व्यतिरिक्त मृत्यूचे कारण नमूद केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. हा नियमच अनेकांना माहिती नसल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्रास होत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनोज अग्रवाल यांनी माहितीचा अधिकार अधिनियमान्वये अकोला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून माहिती मागविली. त्यात नमूद केले आहे की, कोणत्याही व्यक्तीचा त्याचे रहाते घरी नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांनी मृत्यू दाखला मिळवण्यासाठी प्रपत्रात माहिती भरून द्यावी लागणार आहे.
कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू उपचारादरम्यान रूग्णालयात झाला तर माहिती दुसऱ्या प्रपत्रातमध्ये भरून द्यावी लागणार आहे. मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र संबंधित रूग्णालयामार्फत दिले जाते. रूग्णालयाबाहेर निवासस्थानी उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास उपचार करणार्या वैद्यकीय व्यवसायिकाचे (डॉक्टरचे) मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र लागणार आहे. ही माहिती देखील प्रपत्रात भरून द्यावी लागणार आहे. महानगरपालिका प्रशासन निवासस्थानी नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या सर्वांसाठी प्रपत्र भरून देण्याची व मृत्यूच्या कारणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करित आहे. त्यामुळे कुणी घरी उपचार घेत असो अगर नसो अशा व्यक्तीच्या मृत्यूसाठीही वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार आटोपून महापालिकेत मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांना हा नियम सांगण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोणता डॉक्टर मृत्यू प्रमाणपत्र देणार असा प्रश्न या लोकांपुढे निर्माण झाला होता. वास्तविकतेत नागरिकांशी संबंधित या प्रकरणामध्ये महापालिकेने व्यापक प्रचार-प्रसार करणे गरजेचे आहे. असे असतानाही प्रशासकीय यंत्रणा शांत बसून आहे, ज्याचा त्रास नागरिकांना होत आहे.