– प्रसन्न जकाते
अकोला : अकोला शहरात दंगल घडविण्यात येणार आहे. या दंगलीचे प्लानिंग सहा महिन्यांपासून सुरू होते. ज्या भागात ही दंगल घडले त्या भागातील नागरिक सोडून अन्य भागातील नागरिक तेथे जाऊन ही दंगल घडवतील. कोण, कसे, कुठे अगदी नाव, गाव, पत्त्यांसह राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) महाराष्ट्र व अकोला पोलिसांना सहा महिन्यांपूर्वीच कळविले होते. दंगल घडविण्यापूर्वी त्या भागातील रेकी केली जात आहे, हे देखील एसआयडीने अकोला पोलिसांना सुमारे पाच महिन्यांपूर्वीच पाठविलेल्या गुप्त अहवालात सांगितले होत. परंतु एसआयडीच्या या गुप्त अहवालाला ‘लाईटली’ घेणे महाराष्ट्र व अकोला पोलिसांना आता भारी पडले आहे.
अकोट फैल भागातील तणाव हा जुने शहरातील दंगलीपूर्वीची ‘टेस्ट’ होती. अकोला पोलिस किती वेळात ‘रिस्पॉन्स’ देतात याचा अंदाज घेण्यात आला व त्यानंतर सुनियोजित पद्धतीने जुने शहरात दंगल घडविण्यात आली. एसआयडीच्या रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी गस्त वाढविली असती. टोकटाक सुरू केली असती तर कदाचित जुने शहरातील हिंसक घटना टळली असती. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातील एका जबाबदार अधिकाऱ्याने ‘नवस्वराज’ला ही माहिती दिली. एसआयडीच्या अहवालात जसे नमूद होते अगदी त्याच पद्धतीने ही दंगल घडली.
जुने शहराशी काडीचाही संबंध नसलेला जमाव हजारोंच्या संख्येने जमा झाला आणि दगडफेकीला सुरुवात झाली. निमित्त करण्यात आले ते केवळ एका फेसबुक पोस्टचे. ज्या मार्गांवरून हजारोंच्या संख्येने हिंसक जमाव आला, तेथे पोलिस ठाणे होते. परंतु सुमारे दीड तासापर्यंत पोलिस ताफा दंगलग्रस्त भागात पोहोचू शकला नाही. पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे आणि त्यांचे सहकारी अधिकारी मिळत असलेल्या माहितीच्या आधारे धावाधाव करीत होते. परंतु त्यांचे प्रयत्न थिटे पडले. परिणामी दंगलीमध्ये एका निष्पाप व्यक्तीला प्राण गमवावे लागले.