Akola News : वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीत समावेशाचे घोंगडे अद्यापही भिजत असल्याने आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अकोला पश्चिम मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा ही निवडणूक लढणार आहेत यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पोटनिवडणुकीनंतर विजयी होणाऱ्या आमदाराला केवळ काही महिन्यांनाच कार्यकाळ मिळणार असला, तरी मिश्रा यांनी हा ‘चान्स’ घेण्याची जोरदार तयारी चालविली आहे.
बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी देशमुख यांच्यासह सर्वांनीच राजेश मिश्रा यांनाच अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा आग्रह उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता. ज्यावेळी ही चर्चा झाली, त्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यास अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघाबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे तूर्तास धीर धरा असा संदेश ठाकरे यांनी अकोल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला होता.
‘वंचित’चे काय?
वंचित बहुजन आघाडी अद्यापही महाविकास आघाडीत सहभागी न झाल्याने आता शिवसेना उद्धव ठाकरे गट एकादृष्टीने अकोला पश्चिमची पोटनिवडणूक लढविण्यासाठी सरसावला आहे. पोटनिवडणुकीनंतर विजयी होणाऱ्या आमदाराला काही महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार असल्याचे ‘वंचित’ अगदी याच क्षणी अकोला पश्चिमसाठी आग्रह धरेल असे सध्यातरी वाटत नाही. असे असले तरी ‘वंचित’च्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अकोला पश्चिमसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजेश मिश्रा गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघात त्यादृष्टीने काम करीत आहेत. अकोला पश्चिम मधील राजकीय स्थिती पाहता येथे हिंदुत्ववादी चेहऱ्याची गरज असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
भाजपचे अनेक इच्छुक
महायुतीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. विजय अग्रवाल, डॉ. अशोक ओळंबे, आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र अनुप शर्मा, कृष्णा शर्मा यांचे नाव त्यात घेतले जात आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केवळ काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने या जागेवर कदाचित पोटनिवडणूक होणार नाही, असे वाटत होते. मात्र निवडणूक आयोगाने नियमांची फुटपट्टी लावत पोटनिवडणूक जाहीर केली आहे.