Akola Raid News : सावकारी जाचाला कंटाळत बुलढाण्यात शेतकऱ्याने गळफास घेतला. सोमवारी (ता. 5) घडलेल्या या घटनेनंतर अकोल्यात एकाच वेळी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानंतर बुधवारी ( ता.7) दिवसभरात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलिस विभागाच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली.
अकोल्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे अवैध सावकारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. पहाटे पाच वाजता पासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. शहरातील गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प व जय हिंद चौकापासून कारवाई करण्यात आली. जुने शहर परिसरातील जय हिंद चौकातील एका ज्वेलर्सवर कारवाई करण्यात आली. गोरक्षण रोडवर दोन ठिकाणी, सिंधी कॅम्प मध्ये एका ठिकाणी छापा घालण्यात आला. एकूण 12 ठिकाणी पथकाने एकाच वेळी छापे घातले. उपनिबंधक कार्यालयाने कारवाईसाठी 12 पथके तयार केली होती.
छाप्यांसाठी शासकीय वाहन न वापरता खासगी क्रुझर वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्येक वाहनावर पथक क्रमांक एक पासून ते पथक क्रमांक 12 पर्यंत फलक लावण्यात आले होते. खासगी वाहन चालकांना कारवाईबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अत्यंत गुप्त पद्धतीने हे छापासत्र राबविण्यात आले.