Pune : पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात 4 हजार कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून तब्बल 340 किलो ड्रग्ससाठा जप्त केला आहे. आरोपीच्या टेम्पो मधून हा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे.
मेफेड्रोनच्या साठ्याचा ट्रक पकडला
याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुण्यात याआधी जे आरोपी अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. यावेळी विश्रांतवाडी येथे गोडाऊनमध्ये माल सापडला होता. आरोपीकडून मेफेड्रोन सदृश्य साठा टेम्पो मध्ये देखील ठेवण्यात येत होता. पोलिसांकडून तो ट्रक शोधून काढण्यात आला आहे. ड्रग्जचे जे गोडाऊन होते त्यापासून 3 किलोमीटर लांबवर हा टेम्पो ठेवण्यात आला होता. तिथे 2 मार्च रोजी कारवाई करत जवळपास 340 किलोचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. एमडी आणि मॅथ बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते या गाडीत ठेवण्यात आले होते. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी विश्रांत वाडीत एक आरोपी सापडला होता. तो त्याचा माल ट्रकमध्ये देखील ठेवत होता. विश्रांतवाडी परिसरातून हा ट्रक पोलिसांच्या पथकाने शोधून काढला आहे. या आरोपीचे विश्रांत वाडीत गोडाऊन होते. या गोडाऊन पासून तीन किलोमीटर अंतरावर हा कच्चा माल भरलेला ट्रक ठेवण्यात आला होता. याचे नेमके काय करणार होते, याची चौकशी सुरू आहे.
नऊ आरोपींना अटक
पोलिस आयुक्त पुढे म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 7 ते 8 आरोपी हे फरार असून आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून होलसेल मार्केटमध्ये जागोजागी पाहणी केली जात आहे. ड्रग्जची तस्करी करणारे लाेक आमच्या रडारवर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.