Akola : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. निवडणुकी आधी अकोला शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अकोला पोलिस दलाने कंबर कसली आहे. उपद्रव पसरविणाऱ्या कुख्यात गुंडांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे अस्त्र पोलिसांनी उगारले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली होती. त्यात आता निवडणूक असल्याने गुन्हेगारीवर अंकुश लावणे अत्यंत गरजेचे आहे.
झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार गुंडांना कारागृहात कैद करण्याचा सपाटा पोलीसांतर्फे सुरू करण्यात आला आहे. 2024 हे निवडणुकीचे वर्ष असणार आहे. या वर्षात लोकसभा, विधानसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहेत. तत्पूर्वी लवकरच लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. अतिसंवेदनशील शहरांच्या यादीमध्ये अकोल्याचा समावेश होतो. निवडणुकीच्या काळात शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे हे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. यासाठी सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढविला असून, पदभार हाती घेताच त्यांनी झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यांतर्गत (MPDA) कारवाईला सुरुवात केली आहे.
पोलिस अधीक्षक सिंह शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची माहिती घेत आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच अकोट फैल, डाबकी रोड पोलिस ठाण्याअंतर्गत कारवायी करण्यात आली आहे. निवडणूकीचा काळ जवळ येत असल्याने पुढेही या कारवाया सुरू ठेवण्यात येणार आहेत.