Akola : लोकसभा निवडणुकीत भाजपचे 400 खासदार जर निवडून आले तर संविधान बदलले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री तथा संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते अनंत हेगडे यांनी संघ कार्यकर्त्यांसोबत बंदद्वार चर्चा केली. भाजपचे चारशे खासदार जिंकले तर वर्षभरात संविधान बदलू, असे विधान त्यांनी केले आहे. हे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. अकोला येथे ते बोलत होते. नरेंद्र मोदी हे ओबीसी समजाचे असले तरी त्यांच्याकडूनच हे संविधान बदलण्यात येणार आहे. त्याची सुरुवात झाल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. वंचित बहुजन आघाडीला याची अगोदरच जाणीव झाली आहे. ईस्ट इंडिया कंपनी जशी देशात मागच्या दाराने आली व हुकुमशाह बनली, तसाच प्रकार भाजप करीत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चर्चा होत नसल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनाच साद घातली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील ठरलेल्या जागांची यादी देण्यात यावी, असे म्हटले आहे. यादी आल्यानंतर त्यावर एकत्र बसून आपल्यापुरता निर्णय घेऊ, असे आंबेडकर यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील चर्चा पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून काँगेसलाच माहिती मागण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षात 15 मतदारसंघांच्या जागेवरून वाद आहे. वंचित बहुजन आघाडीचे यात काहीच देणेघेणे नाही. महाविकास आघाडीत आपआपसात भांडण सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसकडे यादी मागितली आहे. आम्ही लेखी देऊनही अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असे आंबेडकर म्हणाले.
सगळेच चोर
काँग्रेसला भुरटे चोर म्हणाल्याच्या वक्तव्यावर प्रकार आंबेडकर यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या डाकुला हरवायचे असते तेव्हा सगळ्या भुरट्या चोरांनी एकत्र येणे गरजेचे असते. भुरटे चार यात आम्ही आमचादेखील समावेश केला होता, असे नाही की आम्ही केवळ काँग्रेसला ‘टार्गेट’ केले. त्यामुळे आंबेडकर यांनी भाजप विरोधी पक्षांना भुरटे चोर अशी उपमा दिली तर भाजप आणि नरेंद्र मोदी यांना डाकु संबोधले.