Home » Prakash Ambedkar : फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद बघावी

Prakash Ambedkar : फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद बघावी

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षासह ‘वंचित’मध्ये जागावाटपाचा तिढा कायम

0 comment

Mumbai : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आणि ‘वंचित’मध्ये अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) अद्याप ठरलेला नाही. जागा वाटपावरून चारही पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्यामुळे ही युती होणारच नाही, असा सूर राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सातत्याने अवाजवी मागण्या करीत असल्याचे बोलले जात आहे. आंबेडकर यांनी शनिवार (ता. एक) स्वबळावर लढण्याची तयारीही दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने राज्यातील 48 पैकी 27 लोकसभा मतदारसंघात आमची ताकद असल्याचे पत्र महाविकास आघाडी नेत्यांना दिले होते. त्यामुळे ‘वंचित’बाबत अनेकजण साशंक आहेत.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसमोर जागावाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता चारही पक्षांमध्ये एकमत होईल, याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांना शंका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढल्यास त्याचे महाविकास आघाडीला किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज घेण्यात येत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना 18 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. शरद पवार गट आणि काँग्रेसलाही जास्तीतजास्त जागा हव्या आहेत. त्यांचे नेते तसे वक्तव्य करत आहेत. यावर ‘वंचित’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी. ताकदीचा अंदाज घेऊनच आघाडीत जागा मागाव्या. उद्या असे होऊ नये की, कोंबडी आम्ही शिजवली आणि आम्हाला फक्त कोंबडीचे मुंडकेच दिले, उरलेली कोंबडी इतर लोक घेऊन गेले. आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले की,आपण शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू आणि मिळून मिसळून सन्मानाने कोंबडी खाऊ.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!