Home » Lok Sabha Election : कडक उन्हात आंबेडकरांची रॅली अन‌् प्रतिसाद..

Lok Sabha Election : कडक उन्हात आंबेडकरांची रॅली अन‌् प्रतिसाद..

Akola Constituency : अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल

by नवस्वराज
0 comment

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. 04) शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, अमरावतीमधून भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. शहरातील टावर चौकात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयातून रॅली काढण्यात आली. टावर चौक, फतेह चौक, खुले नाट्यगृह, पंचातय समिती कार्यालय मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे उमदेवारी अर्ज दाखल केला. डॉ. हर्षवर्धन मालोकार, शहराध्यक्ष मजहर अली, बालमुकुंद भीरड, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ, बळीराम चिकटे, अमर डिकाव, गजानन दांडगे, सिद्धार्थ शिरसाट, माजी सभापती आकाश शिरसाट, अनिल जाधव यावेळी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर, मुलगा सुजात आंबेडकरही रॅलीत सहभागी झाले होते. मतदारांना मतदानाच्या बुथपर्यंत घेऊन जात विजय खेचून आणा असे आवाहन यावेळी आंबेडकर यांनी केले. विजयाची जीद्द बाळगा असे ते म्हणाले. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अकोल्यात कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे विकास करण्यासाठी विजय गरजेचा आहे, असे सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले.

नवनीत राणा रडल्या

अमरावतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत नवनीत राणा भावूक झाल्या. रवी राणा यांनी देखील नवनीत राणा भाजपमध्ये का गेल्या याची भूमिका मांडली. जनतेच्या सेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वाभीमानी पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये गेल्या. असे म्हणत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नवनीत राणा भावूक झाल्या.

गेल्या 12 वर्षांपासून मी संघर्ष केला. काही लोकांनी माझ्या चरित्रावर टीका केली. माझी बदनामी केली गेली. महिलेच्या जीवनात संघर्ष असतो. पण सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा विरोधकांना गप्प करणारा आहे. त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे  आभार व्यक्त करते आहे. माझ्या बदनामीमुळे माझी मुले देखील मला प्रश्न विचारतात, असे भावनिक भाषण राणा यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!