Akola : प्रहार जनशक्ती पक्षाला अकोला जिल्ह्यात अजून एक धक्का बसलाय. अकोट शहरात प्रहार पक्षात राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे. शहरातील बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षातील कलह, गटबाजी, अंतर्गत डावपेच, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी व सुरू असलेले आचारसंहितेचे उल्लंघन अशा अनेक कारणांमुळे हे राजीनामे दिल्या जात आहेत.
अकोट शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक आप्पा उकंडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. उकंडे हे प्रहार पक्षाचे जुने पदाधिकारी असून त्यांनी अकोट तालुक्यातील अपंगांसाठी तसेच रस्त्याच्या विकास कामांसाठी आंदोलने केली आहेत. आपल्या राजीनाम्याचे पत्र जाहीर करून सागर उकंडे यांनी त्यात नमूद केले आहे की, ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोट शहर अध्यक्षपदी कार्यरत आहे. गेल्या 8 वर्षांपासून प्रहार पक्षाचे तनमनधनाने काम करीत आहेत. आमदार बच्चू कडू यांचे कार्य आणि विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार गावपातळी पर्यंत करण्याचे कार्य आतापर्यंत त्यांनी केले.
रुग्णसेवा व दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी काम केल्यामुळे खुप समाधान मिळाले. आंदोलन तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविताना अनेक गुन्हे नोंदविले गेले. त्याचा अभिमानच वाटतो असे उकंडे म्हणाले आहेत. उकंडे यांनी त्यांच्या राजीनाम्यात पुढे म्हटले आहे की, मागील 2 वर्षांपासून प्रहार पक्षात स्थानिक पातळीवर कलह निर्माण झाले आहेत. अंतर्गत डावपेच खेळले जात आहेत. गटबाजी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी, गटबाजी व आचारसंहितेचे उल्लंघन करण्याच्या प्रकारामुळे पक्षात काम करणे कठीण झाले आहे. अकोट शहरातील प्रहार पक्षाला स्थानिक पदाधिकारी आमदार बच्चू कडू यांच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची पायमल्ली होत असताना शांतपणे बघत राहणे शक्य नाही. म्हणून आपण अकोट शहर अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सागर उकंडे यांचे म्हणणे आहे.