नागपूर : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आतापासूनच मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गृहशहर आणि भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गढ असलेल्या नागपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा उत्तराधिकारी जाहीर करून टाकला आहे.
‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे’ अशा आशयाचे फलक सोमवार, २२ मे २०२३ रोजी संपूर्ण नागपुरात लागल्याने महाविकास आघाडीसह सर्वत्र या विषयाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागणारे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या रांगेत आता आदित्य ठाकरेही आले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स नागपुरात लावल्याचे सांगण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी मात्र पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
कोराडी वीज प्रकल्पाविरोधात नागपूरमधील स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांशी, गावकऱ्यांशी आणि पर्यावरणप्रेमींशी चर्चा करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेत. कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावांना त्यांनी भेटी दिल्या. गावकरी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधुन घेतले ते आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री असल्याच्या फलकांनी. आतापर्यंत भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, पंकजा मुंडे यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यात आता आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही भर पडली आहे.