Akola News : भंगार आणि कालबाह्य झालेली उपकरणे, अत्यल्प मनुष्यबळ आणि वीज चोऱ्यांचे वाढते प्रमाण यामुळे अकोला शहरात वीज वितरणाचा हे खंडोबा सुरू आहे. महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी ‘नवस्वराज’ला दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरात महावितरणची अनेक उपकरणे कालबाह्य आणि भंगार झाली आहेत. त्यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे.
दिल्लीमध्ये प्रचंड वजन असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याचे अनेक महिने पालकमंत्री होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या पालकमंत्री असल्याचा कोणताही फायदा अकोला जिल्ह्याला होऊ शकला नाही. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असताना अकोला जिल्ह्यातील एक सेंटीमीटरही वीज वितरणाची वायर बदलली गेली नाही असे आता महावितरणचे अधिकारीच सांगत आहेत. त्यामुळे अकोला पश्चिम मतदार संघातील अनेक भागांना सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे अकोला शहरात वीज गळती व वीज चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही विजेचा योग्य दाब संतुलित होत नसल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा ‘हेवीवेट’ पालकमंत्री जिल्ह्याला लाभला असताना सुद्धा स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेचा जबर फटका उत्सवांच्या काळामध्ये अकोलेकर नागरिकांना सहन करावा लागत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेक डीपींना एबी स्वीच देखील नाही. वीज वितरण कंपनीशी संबंधित अनेक कंत्राट नेत्यांच्या जवळच्या लोकांनाच देण्यात आले. ही कामे व्यवस्थित न झाल्याने वीज वितरण प्रणालीवर ताण पडत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या मे 2023 पासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना वेगवेगळ्या फ्युज कॉल सेंटरमध्ये आणि सब स्टेशनवर स्थलांतरित केले आहे. कोणत्या ग्राहकाला कोणत्या तक्रार निवारण केंद्रामध्ये जोडण्यात आले याची कल्पना स्थानिक नेत्यांनाही नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षाचे दुष्परिणाम आता ऐन उत्सवाच्या काळात अकोलेकर जनतेला भोगावे लागत आहे.
दुर्लक्ष कायमच
एकूण अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी वीज, पिक विम्याची न मिळालेली रक्कम, कायदा व सुव्यवस्था, अपुरा पाणीपुरवठा, अवेळी खंडित होणारी वीज, अर्धवट खड्डे पडलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, उद्योगांचा अभाव, जिल्ह्यात नसलेली एकही उच्च शिक्षण संस्था असे प्रश्न कायम आहेत. अशातच आता ऐन रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती अशा उत्सवाच्या काळात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. या संतापाचा फटका अकोलेकर नागरिक कोणाला देतील याचा नेम नाही.