नांदेड : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे भाषण केल्याचा ठपका ठेवत मूळ अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्या विरोधात नांदेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. नांदेडमध्ये जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर पोलिसांनी लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ एप्रिल रोजीची आहे. बिलोली येथे ९ एप्रिल रोजी श्रीराम नवमीनिमित्त धर्मासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविला. कालीचरण महाराजांवर पोलिसांनी कलम १५३अ, २९५अ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत ही कारवाई केली आहे. कालीचरण महाराज यांच्याविरोधात कारवाई केल्याने त्यांच्या भक्त आणि समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कालीचरण महाराजांचे मूळ नाव अभिजित धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंच बंगला भागात राहतात. ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडीलांचे औषधाचे दुकान आहे. कालीचरण महाराजांचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी कालांतराने आध्यात्माला आपले आयुष्य समर्पित केले. काली मातेचे भक्त असल्यानेच त्यांना कालीचरण महाराज म्हटले जाते.