अकोला : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांचा सोलापूर दौरा चांगलाच गाजत आहे. या दौऱ्यात ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर मांसाहार करून पंढरपूरला जात असल्याचा आरोप केला आहे. अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर यांना हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. पंढरपूरला येताना १० हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे. आपल्या अशा वागण्याने ती अपवित्र करू नका.’ मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये यासंबंधीचा फोटोही पोस्ट केला आहे.
केसीआर यांच्या दोन दिवसीय दौऱ्याला सोमवारी सुरुवात झाली. त्यांच्यासोबत तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आहेत. त्यांचा तब्बल ६०० वाहनांचा ताफा आहे. केसीआर सोमवारी सोलापूर येथे मुक्कामी आहेत. ते सकाळी विठुरायाचे दर्शन घेतील. भारत राष्ट्र समितीचे नेते व कार्यकर्त्यांसाठी सोलापुरातील विविध हॉटेल्समध्ये सुमारे २२० खोल्या बूक करण्यात आल्याचीही माहिती आहे. अशात आमदार मिटकरी यांनी केसीआर यांच्या कक्षाबाहेर शिजत असलेल्या मांसाहाराचा फोटो ट्विट करीत खळबळ उडवून दिली आहे. मांसाहार करून पंढरीच्या वारीला जाऊ नका असा ईशाराही आमदार मिटकरी यांनी केसीआर व त्यांच्या मंत्र्यांना दिला आहे.