Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’चे यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. ‘वंचित’ने राठोड यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या एक दिवस अगोदर उमेदवारी घोषित केली होती. राठोड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रॅली काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. पण शुक्रवारी 5 एप्रिल रोजी झालेल्या छाननीत त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.
‘वंचित’सारख्या महत्त्वाच्या पक्षातील उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यामुळे या मतदार संघातील निवडणुकीची चुरस वाढली आहे. गुरुवार 4 एप्रिल ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती. याठिकाणी वंचितने सुभाष पवार यांना उमेदवारी दिली होती. पण पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे वंचितने बुधवारी रात्री त्यांच्या जागी अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती.
ऐनवेळी धावाधाव
मोठा गाजावाजा करत शुक्रवारी राठोड यांनी आपली उमेदवारी दाखल केली. पण आता त्यांचा अर्जच बाद झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला जोरदार झटका बसला आहे. अभिजीत राठोड हे वाशिम जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील रहिवाशी आहेत. सध्या ते कारंजा मानोरा विधानसभेचे वंचितचे प्रभारी आहेत. त्यांचाच अर्ज बाद झाल्यामुळे यवतमाळ-वाशीम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी कोंडी झाली आहे. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अभिजित राठोड यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघासांसाठी 26 एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 352 उमेदवारांनी 477 अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत 04 एप्रिल रोजी समाप्त झाली. 05 एप्रिल रोजी त्या अर्जांची छाननी झाली. राज्यात दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक अर्ज नांदेडमधून दाखल झाले आहे. नांदेडमध्ये 74 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले. वर्ध्यात सर्वांत कमी 27 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले आहेत.