Amravati : अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार अचानकपणे थांबविला आहे. नवनीत राणा यांनी भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो वापरून प्रचारात आघाडी घ्यायला सुरूवात केली होती. मात्र अचानक हे सर्व प्रचार रथ थांबविण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीची दुसरी आणि महाराष्ट्राची पहिली उमेदवार यादी बुधवारी (ता. 13) जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाली, त्यावेळी राणा यांचा मेळघाटात जोरदार प्रचार सुरू होता. राणा दाम्पत्य कोणालाही जुमानेनासे झाले होते. अशात यादी जाहीर होताच अचानक प्रचार थांबविण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांकडून निरोप मिळाल्यानंतर हा प्रचार थांबविण्यात आला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रचार रथातून मेळघाटात प्रचार सुरू केल्याची माहिती माध्यमांना दिली होती. या प्रचार रथामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर विजय 2024 निर्धार रथ असे लिहिलेले होते. रथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रिपाई नेते रामदास आठवले यांचे फोटो होते. पुन्हा मला साथ द्या आणि आशीर्वाद द्या, असे आवाहन करताना ‘प्रत्येकाला आत्मविश्वास-विजय हमखास’ अशी टॅगलाईन या बॅनरवर होती.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात हा प्रचार जोरात सुरू होता. मेळघाटचा भाग मध्य प्रदेशाला लागून आहे. अशात मध्य प्रदेशला लागून असलेले मेळघाटातील गावे व चिखलदरा तालुक्यातील महत्त्वाच्या व मोठ्या गावात प्रचारात आघाडी घेण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी प्रचार रथ फिरवण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केलेली असली तरी संभाव्य असेलल्या उमेदवार नवनीत राणा यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात उलटसुलट चर्चा होत आहे.