Amravati : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम व आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी 16 मार्च रोजी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत युवा स्वाभिमान पक्षाची भूमिका जाहीर केली. राणा म्हणाल्या की, मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे आमचा पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. नवनीत राणा पुढे म्हणाल्या, आम्ही (युवा स्वाभिमान) एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य आहे. आम्हाला काही महत्वाचे संकेत मिळाले आहेत. त्याची माहिती लवकरच सर्वांना होईल.
देश, राज्य आणि जिल्ह्याचा विकास करणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी,अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करू असे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. युवा स्वाभिमान पक्ष मागील 12 वर्षांपासून एनडीएचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीतही आम्ही एनडीए सोबतच राहणार आहोत. नवनीत राणा या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तसे काही संकेत आम्हाला मिळाले आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन काम करतील, असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.
पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात युवा स्वाभिमानच्यावतीने ठराव पारीत करण्यात आला. या ठरावानुसार, युवा स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे देशहित,राज्यहित व जिल्ह्याचे हित लक्षात घेता नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खासदार नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्याला युवा स्वाभिमान पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल असे ठरविण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अमरावतीमधील उमेदवारी कधी जाहीर होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.