Political News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा पुन्हा एकदा हनुमंताला शरण गेली आहेत. भाजपाचा स्थापना दिवस आणि खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवस राणा दाम्पत्याने अमरावती शहराजवळ असलेल्या हनुमान गढी येथे साजरा केला. शहरातील 501 जोडप्यांसोबत हवन करीत त्यांनी हनुमंताला ‘कौन सो संकट मोर गरीब को, जो तुमसे नही जाता है टारो..’ अशी आर्त विनवणी केली.
गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. महायुती मधील भाजपसह सर्वच पक्ष नवनीत राणा यांना विरोध करीत आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यामधील सर्वच राजकीय नेत्यांशी शत्रुत्व निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पार्टी आदी सर्वच राणांविरोधात मैदानात उतरले आहे. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा लोकसभेची ही निवडणूक जिंकणार नाहीत, यासाठी सत्ताधारी व विरोधक दोघांनीही चांगलीच कंबर कसली आहे.
अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे राणांसोबत असलेले वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असे अडसूळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी आपण नवनीत राणा यांच्या विरोधात काम करू असे जाहीर केले आहे. कोणीही साथ देत नसल्यामुळे नवनीत राणा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नवनीत राणा यांनी आपल्या पतीच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे. राणा यांना भाजपकडून भक्कम पाठिंबा असला तरी दिल्लीतील नव्हे तर गल्लीतील नेते कामात येतील असा इशारा भाजपाचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला होता. अमरावती मधील एकूण राजकीय परिस्थिती पाहता अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा एकदा हनुमंताला शरण जाणे पसंत केले आहे.
शनिवारी भाजपाचा स्थापना दिवस आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस असा दुहेरी योग जुळून आला. त्यामुळे राणा दाम्पत्याने हनुमान गढी येथे जात 501 जोडप्यांसोबत हवनात सहभाग घेतला. असे म्हटले जाते की जो व्यक्ती मनोभावे हनुमंताला शरण जातो त्याला हनुमान संकट मोचक होऊन सर्व प्रकारच्या अडचणीतून बाहेर काढतात. त्यामुळेच कदाचित नवनीत राणा आणि रवी राणा पुन्हा एकदा हनुमंताला शरण गेली असावे, अशी चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आहे.