Batwadi Village :क्षुल्लक कारणावरून अकोल्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या बटवाडी बुद्रूक गावात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. नितीन सुधाकर आखरे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जुन्या वादातून आठ ते दहा जणांनी नितीन यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांची हत्या केली. घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले आहे.
बटवाडी बुद्रूक गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आखरे, पुंडे आणि कुटे या तीन कुटुंबात एका जागेवरुन वाद सुरू होता. आखरे कुटुंबातील एकाने या वादग्रस्त जागेवर खत आणून टाकले. त्याच खतावर दुसऱ्या एका कुटुंबाने जनावरे आणून बांधली. यावरुन तीनही परिवारांमध्ये वाद झाला.
वाद चिघळल्याने खून
वादानंतर प्रकरण शांत झाले. वाद मिटल्याचे समजून सर्वजण आपापल्या घरी गेले. नितीन सुधाकर आखरे हे घराच्या अंगणात झोपले होते. याचवेळी काही लोकांनी त्यांच्यावर लाठीकाठी आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात नितीन आखरे यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (ता. १) पहाटे आखरे यांच्या पत्नी त्यांना जागे करायला आल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ज्यानंतर त्यांनी आरडाओरडा करीत गावकऱ्यांना गोळा केले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस बटवाडीत दाखल झालेत. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.