अकोला : सामाजिक कार्यकर्ते प्रा. रणजित इंगळे यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना शनिवार, १७ जून २०२३ रोजीच्या रात्रीस घडली.
प्रा. इंगळे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत. अकोल्यातील एस. ए. कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते जुने बस स्थानक जवळ सेतू केंद्र व साप्ताहिक वृत्तपत्र चालवित होते. प्रा. इंगळे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. घटनास्थळी मृतक प्रा. इंगळे यांची दुचाकी गाडी उभी होती. गाडीचे कुठलेच नुकसान झालेले नाही. गाडीवर ठेवलेल्या पिशव्या व पैसे देखील जसेच्या तसेच होते. मृतक रणजित इंगळे यांना मारेकऱ्यांनी मारत घासत ओढून अंधारात रस्त्ताकडेला फेकले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व जुने शहरचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. ठसे तज्ञ्ज आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मारेकरी कॅमेराबद्ध झाला आहे. मात्र चेहरा अस्पष्ट आला आहे.