अमरावती : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती चांगलीच ढासळली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि त्यांच्या परिवाराला धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.
आमदारांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमदारांच्या परिवाराला सुरक्षा पुरवायला सरकार बांधील नाही. शिवसेना कार्यकर्ते केवळ आदेशाची वाट पहात आहेत, असे नमूद करीत खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अप्रत्यक्ष धमकीच दिली. त्यावर प्रत्युत्तर देताना खासदार राणा यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली.
सुरक्षा काढली नाही : गृहमंत्री
बंडखोर आमदार किंवा मंत्री यापैकी कुणाचीही सुरक्षा काढण्यात आलेली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कलम 144 लावल्याचे ते म्हणाले.