अकोला : खासगी कुरीअर सेवेने पत्र, पार्सल व अन्य सामान पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. जलद गतीने सेवा मिळत असल्यामुळे लोक खासगी कुरीअर कंपन्यांकडे आकर्षित झाले आहेत. काही कंपनी योग्य व तत्पर सेवा पुरवितात मात्र काहींचा अनुभव चांगला नाही.
बुकिंग करताना काही गोष्टी ग्राहकांपासून हेतुपुरत्सर लपवून ठेवल्या जातात. एखाद्या शहरात कंपनी विशिष्ट भागातच घरपोच सेवा देते, काही ठिकाणी शहराच्या कुठल्याही भागातील एकापेक्षा जास्त डाक असल्यासच घरपोच सेवा दिली जाते. नाहीतर डाक मिळण्यास पाच ते सात दिवस विलंब होतो. कंपनीचे प्रतिनिधी फोन करून कार्यालयातून सामान घेऊन जाण्यास सांगतात. ही ग्राहकांची फसवणूक आहे.
मोठ्या शहरांचा भौगोलिक विस्तार झपाट्याने होत आहे. काही शहरे ३० ते ४० किलोमीटर पसरली आहेत. लगतची खेडी महानगरात विलीन झाली तरी पत्र आदींवर उल्लेख महानगराच्या नावाचाच करण्यात येतो, लांब अंतरावर एक डाक देण्यासाठी कुरीअर बॉयला पाठवणे शक्य नसते, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून डाक कार्यालयातून नेण्यासाठी फोन केला जातो. अशी माहिती गुजरातच्या एका मोठ्या कुरीअर कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीनी दिली. बुकिंग करताना ग्राहकांना याबाबत अंधारात ठेवणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक नव्हे का? या प्रश्नावर त्यांनी मौन पाळले. भारतीय डाक विभागाने साधी पत्र लोकांना खात्रीलायकपणे मिळावीत तसेच स्पीडपोस्ट, रजीस्टर्ड पत्र, पार्सल द्रुतगतीने मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास खासगी कुरीअर कंपन्यांची दादागिरी आणि फसवणुकीला आळा बसेल.