Home » अमोल मिटकरींची सुषमा अंधारेंवर टीका

अमोल मिटकरींची सुषमा अंधारेंवर टीका

by नवस्वराज
0 comment

अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे यांचा उल्लेख रडरागिणी असा करीत नाव न घेता मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मंगळवार, ९ मे २०२३ रोजी सातारा येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसमोरच अंधारेंचा अश्रूंचा बांध फुटला. त्याचवेळी त्यांनी अजित पवारांविरोधात तक्रार केली. त्यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी अंधारेंचा ‘रडरागिणी’ असा उल्लेख करत टोला लगावला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचे समर्थन करतानाच सुषमा अंधारेंना डिवचले आहे.

सकाळी ६ वाजल्यापासून सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा पवार आहेत, असा उल्लेख आमदार मिटकरी यांनी केला आहे. हल्ली अजितदादांवर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आला असल्याचे आमदार मिटकरी यांनी नमूद करीत अजित पवार यांच्या बाजुने आपण असल्याचे दाखवून दिले आहे. ‘दादाविरुद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो, रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते’ असे लिहित आमदार मिटकरणी यांनी #रडरागिणी हा हॅशटॅग वापरला आहे.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भाषण केले. त्या म्हणाल्या की, येथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जुन सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलिस स्टेशनला त्याची तक्रार लिहुन घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता अशी तक्रार अंधारे यांनी पवारांकडे केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!