बाभुळगाव (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री पाहिला ज्याच्या खिशाला अडीच वर्षे पेन नव्हता. उद्धव ठाकरे असेच मुख्यमंत्री होते बिना पेनाचे. त्यामुळेच त्यांना शिवसेनेचे ५० आमदार सोडून गेले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. येथे आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करीत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बेईमानी केल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला. पेन नसल्याने त्यांनी कधी आमदारांच्या पत्रावर सही केली नाही. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री यांच्या खिशाला मात्र चार-चार पेन आहेत असे बावनकुळे यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या वेळेस बेईमानी केली. मुख्यमंत्री पदाची चोरी केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यांच्या अडीच वर्षाचा काळ वाया गेला. त्यानंतर मर्द मराठा एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाहेर निघाले. खोके ओके हा विषय कुठे आहे, ते खोटे सांगतात. खोक्याने कधी आमदार निवडून येतात का? असा प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे हे महाभारतील धृतराष्ट् प्रमाणे आहेत, पुत्र प्रेमात ते आंधळे झाले होते असाही शाब्दिक हल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.