Home » बच्चू कडुंनी सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

बच्चू कडुंनी सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

by नवस्वराज
0 comment

अमरावती : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील महिन्याभरापासून राखून ठेवलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सुरक्षित झाले आहे. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. अशात प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडु यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच जाहीर करून टाकली आहे.

बच्चू कडु यांच्या म्हणण्यानुसार २६ मे पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. उद्धव ठाकरेंचे सरकार पुनर्स्थापित करता येत नाही, असे न्यायालयाने म्हटल्यानंतर शिंदे गटातील अनेकांनी पाण्यात ठेवलेले देव बाहेर काढले आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराची घाई अनेकांना झाली आहे. एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार मंत्रीपदाकडे डोळे लाऊन बसले होते. मात्र सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात होता. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तार टाळला होता. आता सुमारे १० महिन्यांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे त्यांनी स्पष्ट केले. एकूण २० आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्वत: बच्चू कडु आणि आमदार संजय शिरसाट हे देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. बुलडाण्यातून आमदार संजय गायकवाड, डॉ. संजय कुटे, अकोल्यातून रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा सुटल्यास त्यातूनही मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!