Akola : थंडीचे प्रमाण कमी होताच डासांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात विषमज्वराचा धोका वाढला आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुडूंब भरलेल्या नाल्या, संपूर्ण मोर्णा नदीत पसरलेली जलकुंभी या व महानगरातील अन्य समस्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोला, महानगर सुधार कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी 20 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेचे वैद्यकीय व स्वच्छता अधीकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांना समस्यांबाबत अवगत केले.
मनपाच्या रूग्णालयात विषमज्वरासाठीच्या औषधीचा साठा उपलब्ध ठेवावा. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. नाल्यांची स्वच्छता करावी. फॉगिंग मशीन द्वारे फवारणी करण्यात यावी, तसेच युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबवून शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदितील जलकुंभी ताबडतोब काढावी.अशी व्यवस्था करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोला, महानगर सुधार कृती समितीच्यावतीने मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आली. अधीकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नागरीकांनी दारं व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, पाण्याची साठवणूक जास्त दिवस करू नये. कोरडा आठवडा पाळावा तसेच परिसर स्वच्छ ठेवून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
महानगर सुधार कृती समितीचे प्रमुख डॉ. अशोक ओळंबे, जिल्हा संघटनमंत्री हेमंत जकाते, अध्यक्ष दिनेश पांडे, सचिव मनोज अग्रवाल, वीज संघप्रमुख मंजीत देशमुख, मार्गदर्शक मनोहर गंगाखेडकर, व्यापारी संघप्रमुख नरेंद्र कराळे, अतुल पवनीकर, माजी नगरसेवक शशी चोपडे, अतुल येळणे, माजी नगरसेवक विलास गोतमारे, प्रा. शिवकुमार चौबे, अरविंद भिरड, डॉ. गजानन कऱ्हे, श्याम पोद्दार यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समस्यांबाबत अवगत केले, असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.