Mumbai : भाजपाच्या पहिल्या यादीत पक्षाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यावरून राजकारण रंगले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपवर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. गडकरी यांना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शनिवारी भाजपच्या 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव यादीत नसल्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. काळा पैसा गोळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा असे राऊत यावरून म्हणाले. महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असे आवाहन शिवसेनेने नितीन गडकरी यांना केले आहे.
भाजपचे प्रत्युत्तर
पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या ठाकरे गटात केवळ घरकोंबडा बाप आणि त्याच्या 33 वर्षांच्या मुलालाच पद, सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेश द्वारावर अपमान येतो. नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरींचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असे भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.